Nabhik Samaj

     विस्कटलेला नाभिक समाज 

Disintegrated Nabhik Samaj

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये आज रोजी नाभिक समाजाची जी अवस्था झाली आहे त्याला कारणीभूत कोण आहे यावर विचार मंथन होणं गरजेचं आहे म्हणून हि पोस्ट.विस्कटलेला नाभिक समाज Disintegrated Nabhik Samaj

            मनोगत प्रकाश सोनवणे 

        महाराष्ट्रात नाभिक समाज एकसंघ होऊन एकाच झेंड्याखाली एकवटला होता. राज्यातील ओ. बी. सी. समाजात एकजुटीने आपले एक आगळे - वेगळे स्थान नाभिक समाजाने निर्माण केले होते. याला पुढारपण म्हटले तरी चालेल. पण इतर लहान समाज नाभिक समाजाचे नेतृत्व मान्य करु लागले होते.  समजतील सर्व क्षेत्रातील कर्तबगार माणसे आपल्या नाभिक समाजाच्या एकजुटीसाठी व प्रगतीसाठी पेटून उठली होती !  लाखो नाभिक समाजबांधव  आपल्या वरील होत असलेला अन्याय  व आपल्या न्याय  मागण्यांसाठी रस्त्यावर उतरायला तयार झाला होता. गावा-गावात, राज्य पातळीवर राजकीय नेत्यांनी नाभिक समाजाच्या संघटनात्मक कार्याची दखल घ्यायला सुरवात झाली होती. प्रामुख्याने सन 1960 पासून नाभिक समाज गावा-गावात जागृत व सक्रिय व्हायला सुरुवात झाली होती . 2000 साला पर्यंत नाभिक समाजाने राज्यात उत्कृष्ठ संघटनात्मक कार्य करून राज्यात आपला स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. या सत्कर्मात अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यापैकी बरीच मंडळी आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी जे कार्य समाजाच्या उन्नतीसाठी केले आहे त्यांना समाज कधीही विसरणार नाही. नाभिक समाजाच्या  "इतिहासाच्या " पानात त्यांचे एक " सोनेरी पान " नक्कीच असणार आहे.                                                          

          कै.ना.भु.संगमवार एक सोनेरी पान 

         या सोनेरी पाना पैकी सुरुवातीचे एक पान हे कै. ना. भु. संगमवार जींचे यांचे आहे. आजच्या तरुण मंडळीना समाजात ना. भु. संगमवार यांच्या योगदानाची कल्पना नसेलही .आणि म्हणून आपण ती करून दिली व त्यांच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून त्यांच्या पुढे ठेवली तरच त्याना कळेल. आणि ते आपले कर्तव्य व दाईत्व आहे. हेच  महत्व पूर्ण कार्य सोलापूर चे नाभिक समाजातील श्री. दत्तात्रय वी. पारपल्लीवार यांनी आणि ना. भु. संगमवार याचे भाचे श्री. अनिलकुमार पा. मल्लेलवार  पुणे यांनी ना. भु. संगामवार यांचे चरित्र पर पुस्तक लिहून पूर्ण केले आहे. ना. भु. चे सामाजिक कार्य काळाच्या पडद्याआड जाण्या आधीच नाभिक समाजा समोर आणण्यात हे दोघे यशस्वी झाले आहेत, त्या बद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो !. ना. भु. च्या समवेत ज्यांनी समाजकार्य केले असे नाभिक बांधव, नेते दुर्दैवाने आज कमी असतील. सोलापूर येथील आदरणीय समाज नेते श्री. पांडुरंग चौधरी सर यांचे योगदान समाजासाठी फार मोठे व मोलाचे आहे. आपले आण्णा  कै. शंकरराव जगताप याचे अत्यंत आवडते विश्वासू सहकारी मित्र म्हणून पांडुरंग सर होते , हे मी स्वतः पाहिले आणि अनुभवले आहे. मध्यन्तरी नाभिक समाजाच्या झालेल्या फाटाफुटी नंतर चौधरी सरानी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष व्हावे व समस्त महाराष्ट्रातील नाभिक समाजाचे सारथ्य  करावे अशी अण्णांची इच्छा होती. अण्णा माझ्याजवळ याबाबत बोललेही होते. मात्र अण्णा थोडे लवकर गेले आणि आजचा विस्कळीत, शकले झालेला नाभिक समाज आज आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत! ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. काही सत्ता पिसासू मंडळीमुळे आपला एकसंघ समाज विस्कटला  गेला आहे.                          

            नाभिक शब्दाचा वापर  

        1960 साला नंतर महाराष्ट्रातील नाभिक समाज एका छत्राखाली ' नाभिक ' म्हणून यायला सुरुवात झाली होती. आपली जात सांगायला समाज बांधव चारचौघात घाबरत होता, तर काही महाशय लाजत असत. अश्या परिस्थितीत हळू-हळू समाजाने बाळसे धरायला सुरवात केली होती. याच कालखंडात मुंबईत नोकरी- धंद्यात स्थिरावलेली काही मंडळींनी नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी "भाई वीर कोतवाल", " संत सेना महाराज" या नावाखाली संघटना बांधायला सुरुवात केली होती. 

    कै.अंजनाताई मगर  

        त्यां काळी कै. अंजनाताई मगर ह्या काँग्रेसच्या नाभिक समाजातील नेत्या म्हणून आपले राजकीय स्थान मुबंईत भक्कमपणे निर्माण करून होत्या तर धुळ्यात    "संतसेना कॉलनी" ही फक्त नाभिक बांधवाची म्हणून उभी राहिली होती.1980 च्या कालखंडात नाभिक समाजाने आपले शिखर गाठण्यात सुरूवात केली व तालुका, जिल्हा स्तरावर नाभिक संघटना तयार होऊन आपली हक्काची लढाई लढण्यास तयार झाल्या होत्या. 

   मा.श्री . शंकरराव जगताप 

         विधान सभेचे तत्कालीन कोरेगाव (सातारा ) मतदार संघांचे आमदार व आपले सगळ्यांचे आण्णा स्व. शंकरराव जगताप हे ताकतीने आमदार म्हणून सातत्याने निवडून येऊ लागले. ( कै. यशवंतराव चव्हाण साहेबांची दूरदृष्टी व आशीर्वाद ) त्यांच्याच जोडीला त्याच जिल्ह्यात स्व. हनुमंतराव साळुंके यांनी काँग्रेस पक्षात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले होते. दोन्ही नेते नाभिक समाजातील आहेत हे तेथील जनताच नव्हे तर राज्यातील बहुजन समाजही ओळखू लागला होता. याच जोडीने राज्यातील नाभिक समाज एकसंघ बांधण्याचा चंग बांधला होता. तो पर्यंत राज्य स्तरावर नाभिक समाजाचे एकसंघ महामंडळ नव्हते. जिल्हा स्तरावर संघटना मात्र आपल्या ताकतीने  काम करीत होत्या तर काही राज्य पातळीवर काम करीत होत्या. कै. अण्णा व कै. तात्या यांनी राज्यभर दौरे करून नाभिक बांधवाना धीर दिला व त्यांना धैर्याने उभे राहण्याची ताकत दिली. त्या अगोदर राज्यात बऱ्याच ठिकाणी वार्षिक संमेलने, परिषदा होत होत्या व आपल्या हक्काच्या मागण्यांचे ठराव पास करून सरकार दरबारी देत होते. 

     महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना 

                     1982 साली कोल्हापूर येथे राज्यस्तरीय नाभिक बांधवांची ऐतिहासिक परिषद संपन्न झाली. या परिषदेत तत्कालीन नाभिक समाजाचे बिहारचे मुख्यमंत्री स्व. करपुरीजी ठाकूर उपस्थित होते. तत्कालीन विधानसभा उप सभापती शंकरराव जगताप उर्फ अण्णा ही उपस्थित होते. त्याच परिषदेत राज्य स्तरावर नाभिक समाजाचे एकसंघ, एकछत्री " महामंडळ " स्थापन करण्यात आले व त्यास " महाराष्ट्र नाभिक महामंडळ " असे नाव देण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हा स्तरावरील संघटनाचे विलिनीकरण या महामंडळात करण्यात आले

 हणुमंतराव साळुंखे संस्थापक अध्यक्ष 

                 या महामंडळाचे ' प्रथम ' अध्यक्ष म्हणून " हनुमंतराव साळुंके " उर्फ " तात्या " यांची निवड करण्यात आली. आणि त्यांना योग्य शिलेदार म्हणून सोलापूरचे समाज बांधव " ना.भु.संगमवार " यांची महामंडळाच्या "सरचिटणीस" पदी नियुक्ती करण्यात आली. ज्या संघटनेचा  सरचिटणीस कर्तबगार असतो, ती संघटना पुढे नावारूपाला येते. नाभिक महामंडळ अवघ्या दहा ते पंधरा वर्षात राज्यात संघटनात्मक काम करणारे महामंडळ म्हणून नावारूपास आले ते केवळ कै.ना. भु. संगमवार यांच्या मेहनतीने आणि कष्टाने म्हटले तरी चालेल.      

           .ना.भु. संगमवार हे सोलापूरवासीय. घरातील भाषा तेलगू तर शाळेतील भाषा मराठी. जन्मापासूनच ते सोलापुरात रहात म्हणून त्यांची या मातीशी नाळ जुळलेली. कॉलेज जीवनापासूनच त्यांना समाज सेवेची आवड होती. नोकरी ही रेल्वेत मिळाली. आणि त्यानी समाजकार्यसाठी  "पायाला भिंगरी " बांधली.1976 साली त्यांनी महाराष्ट्र राज्य व राज्या बाहेरील समाज बाधवाना नाभिक समाज सेन समाज ' या छत्राखाली एकवटण्यासाठी रेल्वेने लाखो किलोमीटर प्रवास केला. देशातील अनेक राज्यात त्यांनी दौरे काढले. त्यांना इंग्रजी आणि हिन्दी भाषा अवगत असल्याने उत्तर भारत, दक्षिण भारत या ठिकाणी भाषेची कोणतीही अडचण येत नव्हती. त्यांच्या आयुष्यातील 30 वर्ष त्यांनी समाजकार्य साठी वाहिली. 10 लाखाच्या वर प्रवास केला. 

     त्रिदेव 

 स्व. अण्णा, तात्या, यांच्या विश्वासास ते पात्र ठरले. सन  2000 पर्यंत सारा महाराष्ट्र महामंडळाच्या छत्राखाली या " त्रीदेव " नी एकवटला होता. एक नवी उभारी, जिद्द व नवंचैतन्य समाजात निर्माण करण्याचे कार्य या तीनही महानुभवी नेत्यांनी केले होते. समाजात एक वेगळी स्व-त्वाची लाट उत्पन्न झाली होती.  जातीची ओळख द्यायला लाजनारा, घाबरणारा समाज बांधव गर्वाने स्वतःला "नाभिक " म्हणवून घ्यायला तयार झाला होता व " गर्व से कहो ! हम नाभिक हैं l" अश्या घोषणा देऊन नाभिक समाज बांधव संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर येऊ लागले होते. आपल्या धंद्यातील अवजारांचे  पोस्टर्स घेऊन जिल्हा कलेक्टर ऑफिस असो  अथवा विधानसभा असो, येथे मोठ्या संख्येने मोर्चे काढत होता. सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले होते. विविध भाषी  नाभिक समाज बांधवा मध्ये आपुलकी व प्रेमाचे नाते तयार झाले होते. मुंबईकर ह्यात अग्रेसर होते. स्व. बाबुराव जाधव ( मा. नगरसेवक , मुंबई,) स्व. स्वामी साबळे, स्व.ना. ल. यादव, स्व. बाबुराव वास्के स्व.च. म.जगताप, स्व. शशिकांत चव्हाण, अरविंद क्षीरसागर  हे आघाडीवर होते. याच संदर्भात स्व. शशिकांत चव्हाण यांनी चेंबूर येथे एतिहासिक परिषद आयोजित केली होती. ही परिषद आयोजित करण्यामागे ना. भु. संगमवार यांचा मोठा वाटा होता, सहकार्य होते.  

  नुसते मुंबईकरच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र (चांदा ते बांदा ) नाभिक समाज बांधव  समाज परिवर्तनाची लढाई लढण्यास तयार झाला होता . विदर्भात सर्वश्री फुलबांधे , केलझरकर, इंगळे, अंबादास पाटील, दादिलवार , जमदाडे, रवी बेलपात्रे, नाशिकचे सर्वश्री दिलीप जाधव, रामदास जाधव,  भगवानराव बिडवे, औरंगाबादचे दिलीप अनारर्थे,  वखरे, कोकणात श्री. महादेव चव्हाण, पुणे येथील अशोकराव यादव व अशी अनेक सन्माननीय बांधवांनी समाज प्रबोधन व  परिवर्तन कार्यात स्वतःहून जुंपून घेतले होते व 

नाभिक समाजासाठी SC कॅटेगरी ची मागणी 

     नाभिक समाजाची प्रगती झाली पाहिजे व नाभिक समाजाचा समावेश SC कॅटेगरीत  करून त्या सवलती नाभिक समाजास ही मिळाव्यात या साठी दर नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चे काढीत होती. समाज प्रबोधन सोबत नाभिक व्यवसायातील कलाकार व कलाकृती बाबत मुंबईत श्री.उदय टक्के नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली होती. या क्षेत्रात अमुलाग्र बदल श्री. उदय टक्के घडउन आणीत होते

१९८०/८२ च्या कालखंडात धुळे येथे उत्तर महाराष्ट्रातील नाभिक समाजाचे नेते R D. महाले यांनी नाभिक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करून तत्कालीन देशाचे गृहमंत्री ( जळगाव चे ) यांना प्रमुख पाहुणे बोलाविले व नाभिक समाजाचा समावेश SC कॅटेगरीत करावा ही एकमेव मागणी ठरावा द्वारे केली. त्यांनी त्वरित देशाच्या तत्कालीन पंतप्रधान आदरनिय इंदिराजी गांधी यांच्याकडे नाभिक समाजाचे  शिष्टमंडळ नेले. धुळ्याचे RD Mahale, मुंबईहून स्वामी साबळे आणि अजून २/४ मंडळी त्यात होत्या. आदरणीय इंदिराजींनी त्वरित शिष्टमंडळाची मागणी मान्य केली व जाहीरही केली. महाराष्ट्राच्या रेडिओ वरून ही बातमी जाहीर झाली मात्र त्या आदेशाचे पालन आपले राज्य सरकार करू शकले नाही , हे आपले दुर्दैव ! त्या मागेही मोठा इतिहास आहे.

          ना. भु. संगमवार यांच्या सोबत काही काळ काम करण्याची संधी सुदैवाने मलाही प्राप्त झाली होती. मुंबईत मी 1978 साली उच्च शिक्षणा साठी आलो आणि समाज कार्यही करू लागलो होतो. मुंबईतील  वरील सर्व समाज नेत्याशी माझे सलोख्याचे संबंध होते. अविवाहित असल्यामुळे भरपूर वेळ समाज कार्यास देत असे. त्यामुळे ना. भु. संगमवार यांच्याशीही माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. आजचे सिनेसृश्ठीतील  नावाजलेले कलाकार श्री. किशोर कदम हेही आमच्या सोबत नाभिक समाजाच्या उन्नतीचे काम करीत असत.  ना. भू. संगमवर यांनी एकदा मला  नाशिक येथे एका बैठकी साठी सोबत आणले होते. माझी लहान बहीण सौं. सुनंदा जगताप यांच्या कडे रात्री आम्ही मुक्कामास होतो. अचानक ना.भु. ची तब्बेत बिघडली. आमची धावा धाव झाली होती. तरीही दुसऱ्या दिवशी त्यांनी नाशिक येथील बैठकीत उपस्थिती दिली आणि संध्याकाळी आम्ही पुन्हा मुंबईस परतलो.   

 आज नाभिक समाजाची विस्कटलेली घडी 

         समाज विस्कटलेला आहे. गावो - गावी व घरा - घरात महामंडळाचे अध्यक्ष तयार झाले आहेत.आपल्या उद्धिष्टा पासून समाज फार लांब, दूरवर गेला आहे. या साठी पुन्हा समाजात कै. ना. भु. संगमवार जन्मास यायला हवेत. प्रामाणिक पणे व निस्वार्थी पणे काम केले तरच समाजास भविष्य आहे. नाहीतर मग येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.    


            प्रा. प्रकाश सोनवणे.     

सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.

             ( ज्येष्ठ समाज बांधव )